India Trade : भारतातून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीत तिप्पट वाढ

Lokwani Team
Lokwani Team
भारतातून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीत तिप्पट वाढ

०.४६ अब्ज डॉलर्सवरून १.४७ अब्ज डॉलर्सवर निर्यात

Smartphone Exports : नवी दिल्ली : जागतिक आव्हानांना न जुमानता ऑक्टोबरमध्ये भारताची अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात वार्षिक आधारावर तिप्पट होऊन १.४७ अब्ज डॉलर्स झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ०.४६ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. या आर्थिक वर्षात एप्रिल-ऑक्टोबरमध्ये अमेरिकेला होणारी स्मार्टफोन निर्यात गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील ३.६० अब्ज डॉलर्सवरून १०.७८ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

मासिक आधारावर निर्यातीत घट होत होती; परंतु आता ती पुन्हा वाढली आहे. एप्रिलमध्ये ती १.६५ अब्ज डॉलर्स आणि मेमध्ये २.२९ अब्ज डॉलर्स होती. परंतु जूनमध्ये निर्यात १.९९ अब्ज डॉलर्स, जुलैमध्ये १.५२ अब्ज डॉलर्स, ऑगस्टमध्ये ०.९६ अब्ज डॉलर्स आणि सप्टेंबरमध्ये ०.८८ अब्ज डॉलर्सवर घसरली. टॅरिफशी संबंधित अनिश्चिततेमुळे मागणी आणि किमतींवर ताण येण्याची शक्यता असतानाही निर्यातवाढीची गती कायम राहिली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारताची जगभरातील स्मार्टफोन निर्यात एप्रिल-ऑक्टोबर २०२५ मध्ये १०.६८ अब्ज डॉलर्सवरून १५.९५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, जी ४९.३५ टक्के वाढ दर्शवते. जागतिक बाजारपेठेत सातत्याने मजबूत दुहेरी अंकी वाढ दिसून आली. अमेरिकेतील टैरिफ दबाव असूनही सकारात्मक वाढ साध्य करण्याची क्षमता भारताचे धोरणात्मक फायदे, स्केल कार्यक्षमता, सुधारित उत्पादन-संबंधित प्रोत्साहने, विक्रेता परिसंस्था अधिक खोलवर जाणे आणि जागतिक स्मार्टफोन कंपन्यांकडून शाश्वत गुंतवणूक दर्शवते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

स्मार्टफोन निर्यात (डॉलर्समध्ये)

एप्रिल-१.६५ अब्ज

मे-२.२९ अब्ज

जून-१.९९ अब्ज

जुलै-१.५२ अब्ज

ऑगस्ट-०.९६ अब्ज

सप्टेंबर-०.८८ अब्ज

ऑक्टो.-१.४७ अब्ज

पीएमआय ५८.९ वरून ५९.८ वर

नवी दिल्ली: ऑक्टोबरमध्येथोडीशी मंदी आल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये भारताच्या सेवा क्षेत्राच्या वाढीला वेग आला. नवीन व्यवसाय मागणीत झालेली वाढ आणि किमतीवरील दबाव कमी झाल्यामुळे ही सुधारणा झाली. भक्कम मागणीचे पंख लागल्याने एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय व्यवसाय घडामोडी निर्देशांक ऑक्टोबरमधील ५८.९ वरून नोव्हेंबरमध्ये ५९.८ वर झेपावला आहे. ५० पेक्षा जास्त पीएमआय गुण विस्तार दर्शवतो.

भारताचा सेवा पीएमआय नोव्हेंबरमध्ये नवीन व्यवसाय ऑर्डरमुळे वाढला. परिणामी त्पादन वाढीला चालना मिळाली. यावरून असे दिसून येते की, देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी स्थिर असल्याचे दिसते. परदेशातील
बाजारपेठांमध्ये स्पर्धा तीव्र राहिल्याने आंतरराष्ट्रीय विक्री आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली, असे एचएसबीसीच्या मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजल भंडारी यांनी सांगितले. आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेतील कंपन्यांनी मागणी वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय विक्रीत सुधारणा होत राहिली. तथापि, वाढीचा वेग आठ महिन्यांच्या
नीचांकी पातळीवर आला. तीव्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि जगाच्या इतर भागांमधून स्वस्त सेवांची उपलब्धता यामुळे परदेशात विस्ताराची गती मर्यादित झाली.

भविष्यातील उत्पादन वाढीबद्दल आशावादी

नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षाच्या अपेक्षा किंचित कमी झाल्या. राज्य विधानसभा निवडणुकांमुळे वाढत्या स्पर्धा आणि संभाव्य अडथळ्यांबद्दल कंपन्यांनी चिंता व्यक्त केली. असे असूनही मागणी सुधारणे, विपणन योजना आणि किमती कमी ठेवणे यासारख्या धोरणांमुळे कंपन्या भविष्यातील उत्पादन वाढीबद्दल आशावादी आहेत.

किमतींवरील दबाव कमी

महागाईच्या आघाडीवर चांगली बातमी आहे. कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ जवळपास साडेपाच वर्षातील त्यांच्या नीचांकी पातळीवर राहिली. परिणामी, कंपन्यांनी विक्री किमतीत केवळ किरकोळ वाढ केली आहे, जी ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.

Share this Article