Winter Session : आताचा विरोधी पक्ष दिशाहीन, CM देवेंद्र फडणवीसांचा टोला

Lokwani Team
Lokwani Team
आताचा विरोधी पक्ष दिशाहीन, CM देवेंद्र फडणवीसांचा टोला

विरोधी पक्षाने आत्मचिंतन करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिवाळी अधिवेशनात होणार १८ विधेयकांवर चर्चा

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत रिक्त असलेले विरोधी पक्षनेते पद, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आदी विषयांवरून विरोधी पक्षांद्वारे ७ डिसेंबरला पत्रपरिषदेतून सरकारवर हल्ला करत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी येथे झालेल्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आताचा विरोधी पक्ष हा मुद्दे नसलेला दिशाहीन विरोधी पक्ष असल्याचा टोला लगावला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाने आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिला. विरोधी पक्षाने विदर्भ, मराठवाडा व राज्यातील इतर विषय सभागृहाबाहेर मांडण्याऐवजी सभागृहात मांडावे. सरकार यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून १४ डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुपारी विरोधी पक्षाद्वारे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षाची पत्रपरिषद ही निराशेने ग्रासलेली व त्रागा करणारी होती. विरोधी पक्षाने केलेले आरोप हे अभ्यास न करता केलेले आहेत. अधिवेशनात सभागृहात विरोधकांच्या सर्व प्रश्नांची आम्ही समर्पक उत्तरे देणार आहोत. नागपूर हिवाळी अधिवेशनात आम्ही शेवटी जास्त काम करतो. अधिवेशनात १८ विधेयके आम्ही मांडणार आहोत. सर्व विधेयकांवर सविस्तर चर्चा करून ते मंजूर व्हावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. यात विदर्भ व मराठवाड्यातील विषयांवर जास्तीतजास्त चर्चा घडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही, यासाठी विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेसंदर्भातील निर्णय हा विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती घेतात. तो आम्हाला मान्य असतो, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. खासगी कार्यक्रमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रपरिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. रात्री ९ वाजता ते नागपुरात येणार असून १४ डिसेंबरपर्यंत पूर्णवेळ अधिवेशनात राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.

‘काँग्रेस इमानदार होती’ या भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर बोलताना ‘होती’ शब्द वापरून भास्कर जाधव यांनी वस्तुस्थिती मान्य केल्याची मिश्कील टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. चहापानाच्या बहिष्कारासंदर्भातील विरोधी पक्षाचे पत्र आमच्यापर्यंत पोहोचायला दोन तास लागले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सही नव्हती, असे फडणवीस म्हणाले. विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांचे उत्तर देताना, वडेट्टीवार यांनी २०१४ पूर्वीचा विदर्भ आणि २०१४ नंतरचा विदर्भ बघावा. काय बदल झाला आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. राज्य दिवाळखोर झाल्याच्या विरोधी पक्षाच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात स्थिती ओढाताणीची असली, तरी राज्याची अर्थव्यवस्था निकषात चालवत आहोत. योजनेकरता द्यायला आमच्याकडे पैसा आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात ९२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली असून उर्वरित ८ टक्के शेतकऱ्यांचे ‘केवायसी’चे काम सुरू आहे.

विरोधकांचे पाय नेहमीच ‘ब्रेक’वर – एकनाथ शिंदे

चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी बहिष्काराचा ‘प्रोटोकॉल’ कायम ठेवल्याचा टोला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मागच्या अधिवेशनात विरोधक जोरात होते, मात्र ते फक्त सभागृहाच्या पायऱ्यांवर ‘स्टंट’ करण्यात धन्यता मानतात. आताचा विरोधी पक्ष निष्प्रभ दिसतोय. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे नेते घरात होते. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते. विरोधी पक्षाने सभागृहात प्रश्न उपस्थित करावे. आम्ही त्यांना ‘गांभीर्यानेच’ घेणार. त्यांना ‘अंडरइस्टिमेट’ करणार नाही. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही, यासाठी त्यांनी तेवढे संख्याबळ मिळवावे, विरोधी पक्षनेते पदाला आमचा विरोध नाही. विरोधी पक्षाने लोकांचे प्रश्न सभागृहात मांडावे. लोकांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. विरोधक ‘स्पीडब्रेकरचे’ काम करतात, तर सरकारचा पाय नेहमी ‘एक्सेलेटर’वर असतो. आम्ही कामातून उत्तर देतो. घरी बसत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. विरोधी पक्षाच्या सर्व प्रश्नांना सरकार म्हणून उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. फक्त त्यांनी सभागृहाबाहेर बोलण्याऐवजी सभागृहात बोलावे. त्यांच्या काळात फक्त तीन-चार सिंचन प्रकल्प मार्गी लागले होते. महायुती सरकारने १८५ सिंचन प्रकल्प मार्गी लावले आहेत. विरोधकांनी केलेल्या दिवाळखोरीच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी टीका तरी सकारात्मक करावी. देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य आहे.

पत्रपरिषदेला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, इतर मागासवर्ग बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, मृदा व जलसंधारणमंत्री संजय राठोड, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

Share this Article