Goa Nightclub Fire : एकच एक्झीट दरवाजा, तुफान गर्दी अन्.., गोव्यातील क्लबमध्ये नक्की का घडलं? वाचा सविस्तर

Lokwani Team
Lokwani Team
Goa Nightclub Fire : एकच एक्झीट दरवाजा, तुडुंब गर्दी अन्.., गोव्यातील क्लबमध्ये नक्की का घडलं? वाचा सविस्तर

पणजी : गोव्याची राजधानी पणजीपासून २५ किमी अंतरावरील अरपोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या लोकप्रिय नाइटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून मृतांमध्ये ४ पर्यटक व १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर ७ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे नाइटक्लबमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. क्लब बेयकादेशीरपणे चालवला जात होता आणि सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. बाहेर पडण्यासाठी अरुंद मार्ग होते, त्यामुळे घटनास्थळी गोंधळ माजला, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘बर्च बाय रोमियो लेन’ नाइटक्लबमध्ये येण्यासाठी (एंट्री) आणि बाहेर पडण्यासाठी (एग्जिट) दोन्ही मार्ग अत्यंत अरुंद होते. बॅकवॉटरच्या काठावर बांधलेल्या या क्लबकडे जाण्यासाठी देखील एकच रस्ता होता आणि तोही अत्यंत अरुंद. फायर ब्रिगेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की फायर टेंडरला घटनास्थळापासून जवळजवळ 400 मीटर दूर उभे करावे लागले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आणि बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. बहुतेकांचा मृत्यू दम घुटल्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.

आग लागल्यानंतर एकच गोंधळ

आग लागल्यानंतर क्लबमधील लोक जीवाच्या आकांताने इकडे तिकडे धावू लागल्याने एकच गोंधळ उडाला. हैदराबाद येथील पर्यटक फातिमा शेख यांनी सांगितले की, आगीचा भडका उडताच अनेक पर्यटक खाली पळाले आणि ग्राउंड फ्लोरवरील स्वयंपाकघरात गेले. मात्र ते क्लबचा स्टाफ सोबत अडकून पडले.

क्लबमध्ये प्रचंड गर्दी

वीकेंड असल्याने क्लब गर्दीने फुलून गेला होता आणि डान्स फ्लोरवर सुमारे 100 लोक होते. काही मिनिटांतच संपूर्ण क्लब आगीच्या विळख्यात सापडा आणि ताडाच्या पानांनी बनवलेल्या तात्पुरत्या संरचनांमुळे आगीचा भडका उडाला.

बेकायदेशीरपणे चालत होता नाइटक्लब

हा नाइटक्लब बेकायदेशीर होता आणि अरपोरा-नागोआ पंचायतने त्याला गेल्याच वर्षी पाडकामाचे नोटीस जारी केले होते. अरपोरा-नागोआचे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले की, क्लबची संपूर्ण रचना बेकायदेशीर होती. तक्रारीनंतर तपासणी करण्यात आली, मात्र क्लबकडे कोणतेही वैध बांधकाम परवाने नव्हते आणि अग्निसुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात येत होते. त्यानंतर कायद्यानुसार क्लबला पाडकामाची नोटीस देण्यात आली. मात्र अपीलनंतर पंचायत संचालकांनी ती स्थगित केली आणि क्लब निर्धास्तपणे सुरूच राहिला.

तपासात हेही समोर आले की पर्यावरणासंबंधी कोणत्याही मंजुरी घेतल्या नव्हत्या. बॅकवॉटर क्षेत्रातील बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यात आले होते. शिवाय क्लब संचालक सौरभ लुथरा, जमीनमालक आणि बिझनेस पार्टनर यांच्यातील वादामुळेही अनेक तक्रारी झाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ”आग वरच्या मजल्यावरून सुरू झाल्याचे दिसते. दरवाजे अतिशय अरुंद होते, काही लोक बाहेर पडले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर इतर आतच अडकून पडले. काही मृतदेह अंडरग्राउंडमध्ये मिळाले. ही जागा खूपच बंदीस्त होती, त्यामुळे बाहेरची हवा पोहोचत नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली.

मालकांवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री म्हणाले की क्लबने अग्निसुरक्षेची कोणतीही मानके पाळलेली नव्हती. घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. क्लबचे मालक आणि जनरल मॅनेजर यांच्यावर एफआयआर नोंदवला असून त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. बांधकाम आणि सुरक्षेचे नियम पाळले होते की नाही, याचा तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व नाइटक्लबचे फायर सेफ्टी ऑडिट होणार

आता पंचायत स्तरावर सर्व नाइटक्लबचे फायर सेफ्टी ऑडिट केले जाईल आणि सोमवारीपासून नोटिसा दिल्या जातील. नियम न पाळणाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असे कळंगुटचे आमदार मायकेल लोबो यांनी सांगितले.

गोवा पोलिस प्रमुख आलोक कुमार म्हणाले की, सिलेंडर फुटल्याने आग लागली, पण अनेक प्रत्यक्षदर्शींनी याला सहमती दर्शवली नाही. त्यांचे म्हणणे आहे की पहिल्या मजल्यावरील डान्स फ्लोरवर सुमारे 100 लोक होते आणि अचानक आग भडकली. काही मिनिटातच ताडाच्या पानांमुळे आग पूर्ण क्लबमध्ये पसरवली. फॉरेन्सिक अहवाल येईपर्यंत आगीचे नेमके कारण अस्पष्टच राहणार आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना मदत

घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाने जाहीर प्रत्येक मृतकाच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोषातून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दुर्घटनेतील पीडितांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Share this Article