IndiGo Crisis : १-२ नव्हे, ३० दिवसांपासून इंडिगोवर संकट; २००० पेक्षा अधिक फ्लाइट रद्द, नक्की काय घडतंय? वाचा सविस्तर

Lokwani Team
Lokwani Team
१-२ नव्हे, ३० दिवसांपासून इंडिगोवर संकट; २००० पेक्षा अधिक फ्लाइट रद्द, नक्की काय घडतंय? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : देशातील प्रमुख एअरलाइन असलेली इंडिगो कंपनी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. ज्याचा परिणाम केवळ हजारो प्रवाशांवरच नाही तर संपूर्ण भारतीय विमानवाहतूक क्षेत्रावर होताना दिसत आहे. गेल्या ५ दिवसांत कंपनीला १००० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक फ्लाइट्सला उशीर झाल्याने मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रवाशांच्या लांबलचक रांगा, संतापलेले संदेश, गर्दीने फुललेले टर्मिनल्स आणि अचानक बिघडलेले संपूर्ण वेळापत्रक, यामुळे देशासह जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, की भारताची सर्वांत मोठी एअरलाइन अशा अवस्थेत सापडली तरी कशी? मात्र ही अडचण फक्त दोन दिवसांची नाही, गेल्या 30 दिवसांपासून इंडिगो या संकटात सापडली आहे. या काळात तब्बल २००० हून अधिक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीसारख्या मोठ्या विमानतळांवर बुधवारी सकाळपासूनच लोक तासन्‌तास रांगेत अडकलेले होते. अनेक प्रवाशांनी तक्रार केली की एअरलाइनकडून वेळेवर कोणतीही माहिती दिली गेली नाही. अचानक रद्द झालेल्या फ्लाइट्समुळे हजारो प्रवाशांच्या प्रवासाच्या योजना उध्वस्त झाल्या. काही जण बिझनेस मीटिंगसाठी जात होते, काही कौटुंबिक कार्यक्रमांना, तर काही सुट्ट्यांवर जाण्याची तयारी करत होते. इंडिगोचे संपूर्ण ऑपरेशन कोसळल्याने लोक त्रस्त आणि हताश झाले.

प्रवाशांना रडू कोसळले

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंडिगो विमानांच्या गोंधळात भरडल्या गेलेल्या प्रवाशांच्या डोळ्यात पाणी आले. यात महर्षी जानी यांचाही समावेश होता. हवाई गोंधळामुळे त्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर कसे पाणी पडले हे सांगताना त्यांना रडू क कोसळले. ते ते म्हणाले की, मी सकाळी ६.१५ वाजताच्या फ्लाईटने गुवाहाटीला जाणार होतो. आम्हाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ साठी निवडण्यात आले होते. अनेक महिन्यांची तयारी असूनही, विमान रद्द झाल्यामुळे आमच्या सहा सदस्यांच्या पथकाला आणि दोन सोबतच्या मार्गदर्शकांना ही संधी गमवावी लागली. देशभरातील वेगवेगळ्या विमानतळांवर असे हताश झालेले अनेक प्रवासी तक्रारी करीत होते.

सुरुवात गेल्या महिन्यातच

जरी हे संकट अचानक समोर आले असले तरी त्याची सुरुवात गेल्या महिन्यातच झाली होती. नोव्हेंबरमध्ये इंडिगोला 1200 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती, तर डिसेंबरमध्ये फक्त दोन दिवसांत 400 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांची नाराजी हळूहळू वाढत होती आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती जणू स्फोटासारखी बाहेर पडली. या संकटामागे फक्त एकच नव्हे, तर अनेक कारणे आहेत. काही कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेतील कमकुवतपणा, काही बाह्य परिस्थितीचा परिणाम आणि हवामान बदलाचा दबाब देखील व्यवस्थापनावर आहे.

हे आहे सर्वांत मोठे कारण

इंडिगोचे संपूर्ण नेटवर्क अत्यंत बारकाईने तयार केलेल्या आणि टाईट शेड्यूलवर चालते. त्यांच्या मॉडेलमध्ये पायलट आणि क्रूचा जास्तीत जास्त वापर केला जातो. पण 1 नोव्हेंबरपासून DGCA ने लागू केलेल्या नवीन फ्लाइट आणि विश्रांती वेळेच्या नियमांनी हा संपूर्ण ढाचा कोलमडून गेला. नियमांनुसार पायलटांच्या उड्डाणाच्या तासांवर मर्यादा आणल्या, रात्रीच्या उड्डाणांवर बंधने आणली आणि पायलटांना जास्त विश्रांती द्यावी लागणार होती.

सुरक्षेच्या दृष्टीने हे नियम महत्त्वाचे असले तरी इंडिगोसारख्या मोठ्या नेटवर्कला अचानक या नव्या व्यवस्थेत स्वतःला जुळवून घेता आले नाही. परिणामी, विमान उपलब्ध असूनही त्यांना उडवण्यासाठी पुरेसा क्रू उपलब्ध नव्हता. या नियमांनंतर रोस्टरिंगचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाले. ज्याचे ऑपरेशन मिनिटे आणि सेकंदांवर अवलंबून असते, त्या एअरलाइनसाठी ही गडबड धोकादायक ठरली, असे कंपनीच्या काही अधिकार्यांनी सांगितले.

नव्या नियमांच्या दाबाखाली कोलमडले ऑपरेशन

DGCA च्या नवीन फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशननुसार पायलटांच्या दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक मर्यादांमध्ये कपात करण्यात आली. म्हणजेच जास्त फ्लाइट चालवण्यासाठी इंडिगोला अधिक पायलटांची गरज होती. पण अल्पकाळात अतिरिक्त क्रू तयार करणे शक्य नव्हते. मोठ्या एअरलाइनसाठी क्रूची कमतरता म्हणजे एका मोठ्या कंपनीत अचानक अर्धे कामगार कमी झाल्यासारखी परिस्थिती. परिणामी दररोज हजारो प्रवाशांची उड्डाणे प्रभावित झाली आणि संपूर्ण ऑपरेशन कोलमडले.

तांत्रिक बिघाड आणि विमानतळ प्रणालीचे अपयश

मंगळवारी दिल्ली आणि पुणे विमानतळांवरील चेक-इन आणि डिपार्चर सिस्टम अचानक बिघडली. एका तासाचा उशीरही इतक्या मोठ्या नेटवर्कवर मोठा परिणाम करतो. एक फ्लाइट उशिरा झाली तर पुढचीही उशिरा होते, आणि तसतसा उशिराचा हा साखळीप्रकार संपूर्ण नेटवर्कमध्ये पसरतो. इंडिगो इतक्या मोठ्या संख्येने फ्लाइट ऑपरेट करते की एका शहरातील समस्या संपूर्ण देशाला प्रभावित करते.

हवामान बदल अन् प्रवासी संख्या

डिसेंबरचा पहिला आठवडा विमानवाहतूक क्षेत्रासाठी नेहमीच आव्हानात्मक असतो. सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढते, विमानतळांवर प्रचंड गर्दी वाढते आणि हवामानाचा प्रभावही वाढू लागतो. धुके आणि दृश्यमानतेच्या अडचणींमुळे अनेक फ्लाइट्स उशिराने उड्डाण भरतात. इंडिगोचे शेड्यूल आधीच अतिशय तंग असल्यामुळे थोडासा उशीरही संपूर्ण रूटवर परिणाम करते.

इतर एअरलाईन्स इतक्या प्रभावित का झाल्या नाहीत?

इंडिगोचे नेटवर्क आकाराने खूप मोठे आहे. एअर इंडिया, विस्तारा किंवा अकासा यांच्या फ्लाइट्सची संख्या तुलनेने कमी आहे. या एअरलाईन्सच्या नाइट फ्लाइट्सही कमी आहेत. त्यामुळे नवे नियम त्यांच्यावर कमी परिणामकारक ठरले. शिवाय, इंडिगोचे मॉडेल ‘अधिक वापर’ या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे अगदी छोटासा बिघाडानेही संपूर्ण शेड्यूल कोलमडून जाते.

सरकार आणि DGCA यांचे लक्ष आता इंडिगोवर

इतक्या मोठ्या प्रमाणात संचालन विस्कळीत झाल्यानंतर DGCA ने इंडिगोकडून तपशीलवार अहवाल मागितला आहे. आवश्यक असल्यास थेट हस्तक्षेप करण्याचे संकेतही दिले आहेत. कारण देशाच्या विमानवाहतूक क्षेत्रात इंडिगोचा वाटा सर्वाधिक आहे आणि त्याच्या अडचणींमुळे संपूर्ण उद्योगावर परिणाम होऊ शकतो.

पुढील 48 तासांत परिस्थिती सुधारेल का?

इंडिगोचा दावा आहे की ते पुन्हा नेटवर्क स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कंपनीने सांगितले की नाईट शेड्यूल कमी केले जात आहे, क्रूचे नवे रोस्टर तयार केले जात आहे आणि अनेक फ्लाइट्स आधीच रद्द घोषित केल्या जात आहेत जेणेकरून शेवटच्या क्षणी प्रवाशांना त्रास होऊ नये. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी काही आठवडे लागू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

विमानभाडे लुटमारीला चाप

सलग पाच दिवस इंडिगोच्या विमानसेवेचा बोजवारा उडाल्याने देशात विमान प्रवाशांचे अभूतपूर्व हाल आणि आर्थिक पिळवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर जाग्या झालेल्या केंद्र सरकारने शनिवारी सर्वच कंपन्यांच्या कमाल विमान प्रवास भाडे आकारणीवर मर्यादा आणली. त्याचप्रमाणे इंडिगोच्या प्रवाशांना रद्द झालेल्या उड्डाणांपोटी कोणत्याही स्थितीत रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्रवास भाड्याचा परतावा (रिफंड) देण्याचे आदेशही नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केले.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या तात्पुरत्या आदेशानुसार, बिझनेस क्लास आणि आरसीएस उड्डाणे वगळून इतर विमान तिकिटाला ५०० किमीपर्यंत ७५०० रुपये, ५०० ते १००० किमीपर्यंत १२ हजार रुपये, १००० ते १५०० किमीपर्यंत १५ हजार रुपये आणि १५०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी १८ हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. यात करांचा समावेश नाही. यापूर्वी कोरोना महासाथीच्या काळात अशी भाडे मर्यादा लादण्यात आली होती.

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने शेकडो उड्डाणे रद्द केल्याने शुक्रवारी देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे गगनाला भिडले होते. मुंबई-कोलकाता, मुंबई-भुवनेश्वर अशा प्रवासासाठी सुमारे ८० ते ९० हजार रुपये वसूल केले जात होते. एकीकडे इंडिगोच्या गोंधळामुळे विमानतळांवर शेकडो प्रवासी १२ ते २४ तास अडकून पडले असताना, दुसरीकडे इतर कंपन्यांकडून भरमसाट नफावसुली सुरू होती. याची गंभीर दखल घेत, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी सर्व प्रभावित मार्गावर वाजवी आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी नियामक अधिकारांचा वापर केला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ही भाडे मर्यादा लागू राहील, असे मंत्रालयाने
एका निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश जारी करण्यात आले आहेत की, त्यांनी आता निर्धारित केलेल्या भाडे मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे,’ असे त्यात म्हटले आहे.

रविवारी रात्रीपर्यंत रिफंड
इंडिगोची विमान सेवा रद्द किंवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रविवार, ७ डिसेंबर रात्री ८ वाजेपर्यंत सर्व प्रवास भाड्याचा परतावा देण्यात यावा, असे आदेश केंद्राने इंडिगोला शनिवारी दिले. विमान रद्द झाल्याने ज्यांच्या प्रवास योजनेवर परिणाम झाला, त्यांना कोणतेही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये, असेही सरकारने बजावले आहे, परतावा प्रक्रियेत कोणताही विलंब झाल्यास किंवा पालन न केल्यास त्वरित नियामक कारवाई केली जाणार आहे.

दिवसभरात ८०० उड्डाणे रद्द
इंडिगोची ८०० हून अधिक उड्डाणे शनिवारीसुद्धा रद्द करण्यात आल्याचे या कंपनीतर्फे सांगण्यात आले. यात पुणे-४२, कोलकाता-४१, अहमदाबाद-३५, गोवा-१४, जम्मू-काश्मीर-३ अशी उड्डाणे रद्द झाली. शुक्रवारी इंडिगोची १,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली होती. त्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असून आता ग्राहकांच्या तिकिटाच्या परतफेडीला प्राधान्य दिले जात आहे, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. पुढील काही दिवसांत उड्डाणांची संख्या हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे. परताव्यासाठी ग्राहक आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा ग्राहक केंद्राशी संपर्क साधू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात धाव
इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याने यात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जनहित याचिका करण्यात आली आहे. ‘इंडिगो ऑल पॅसेंजर’ आणि इतरांतर्फे ही याचिका अॅड. नरेंद्र मिश्रा यांच्यामार्फत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संकटाची स्वतःहून दखल घेण्याची विनंती त्यात करण्यात आली आहे. इंडिगोच्या गोंधळामुळे नागरिकांचा सन्मानाने जीवन जगण्याचा अनुच्छेद २१ नुसार मिळालेला मूलभूत अधिकार धोक्यात आला. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि वैद्यकीय गरजा असलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी, विश्रांती क्षेत्रे किंवा अगदी आपत्कालीन मदतीशिवाय सोडण्यात आले, अशी तक्रार करण्यात आली आहे.

४८ तासांत सामान परत करा
याशिवाय सरकारने इंडिगोला पुढील ४८ तासांच्या आत प्रवाशांचे सामान त्यांच्या निवासाच्या पत्यावर पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. विमान कंपन्यांना ट्रॅकिंग आणि डिलिव्हरीच्या वेळेबाबत प्रवाशांशी स्पष्ट संवाद राखण्यास आणि विद्यमान प्रवासी हक्क नियमांनुसार आवश्यक असल्यास भरपाई देण्यास सांगण्यात आले आ आहे, असे सरकारने म्हटले आहे. इंडिगोला तक्रार निवारण सुलभ करण्यासाठी समर्पित प्रवासी सेवा आणि परतावा सुविधा कक्ष स्थापन करण्यास सांगितले आहे.

Share this Article