मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) मनसेकडून युती जाहीर करण्यात आली. मात्र, पक्षीय फुटाफूट टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या यादीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून १५० जागा लढवल्या जाण्याची शक्यता असून आतापर्यंत १२५ उमेदवारांना अर्ज वाटप करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांमध्ये जल्लोष, तर न मिळाल्याने अनेकांमध्ये नाराजी पसरली होती. नाराजांची मनधरणी करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंना पुढाकार घ्यावा लागला. ठाकरेंनी यावेळी इच्छुकांना सबुरीचा सल्ला दिला.
शिवसेना फुटीनंतरही मातोश्रीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची रीघ लागली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर शिवसेना आणि मनसे प्रथमच युतीत निवडणुका लढवत आहेत. ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची मानली जात आहे. ठाकरे बंधूंनी अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. तरीही ७० जागा मनसे, शिवसेना (ठाकरे) १५०च्या आसपास जागा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यादी जाहीर न करता उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून थेट एबी फॉर्म देण्यात आले. शनिवारपासून सुरू झालेल्या एबी फॉर्म वाटपात स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. रविवारी रात्री उशिरापर्यंत तर सोमवारी सकाळी १० वाजल्यापासूनच मातोश्रीतून फोन गेलेल्या उमेदवारांची तसेच इच्छुकांची मोठी गर्दी मातोश्रीबाहेर जमली. तर अनेक प्रभागांत उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि समर्थकांच्या बैठकांमागून बैठका स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत १२५ उमेदवारांना अर्ज वाटप करण्यात आले.
मुंबईत राष्ट्रवादीसोबत आघाडी ?
पिंपरी-चिंचवड : पुणे येथील महापालिकेसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गटासोबत मतभेद झाल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी मुंबईत मात्र शिवसेना (ठाकरे) आणि मनसेसोबत राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसची आघाडी निश्चित मानली जात आहे. ठाकरे १५० तर मनसे ७० जागा लढवणार असल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उर्वरित ७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. उद्धव ठाकरे किंवा मनसेकडील काही जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असून तसे झाल्यास ही युती निश्चित मानली जात आहे.
माजी महापौरांचा ठिय्या
माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारीसाठी मातोश्रीवर ठिय्या द्यावा लागला, किशोरी पेडणेकर यांना स्वतः च्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर अर्जवाटप सुरू झाल्यापासून चार फेऱ्या माराव्या लागल्या.
अखेर सोमवारी सायंकाळी प्रभाग क्र. १९९ मधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले, तर शेजारील वॉर्डात शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नीला आबोली खाडे यांना तर विभागप्रमुख आशिष चेंबुरकर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर करण्यात आली.
माजी महापौर श्रद्धा जाधव या पुत्र युवासेना पदाधिकारी पवन जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र, याच विभागात आजी-माजी शाखाप्रमुखांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने तिढा निर्माण झाला. हा तिढा सोडवण्यासाठी श्रद्धा जाधव यांना मातोश्रीवर प्रतीक्षेत राहावे लागले. तर विधान परिषद आमदार सुनील शिंदे हे आपले बंधू निशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले, अखेर प्रभाग क्र. १९४ मधून निशिकांत शिंदे यांना तिकीट मिळाले, तर ही जागा मनसेला न सुटल्याने मनसे पदाधिकारी संतोष धुरी हेही नाराज आहेत.
कार्यकर्त्यांची नाराजी व बंडखोरी टाळण्यासाठी निर्णय
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेऊन उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट ए आणि बी फॉर्म दिले. रविवारी रात्रीपासूनच भाजपकडून मुंबईतील सुमारे १०० उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांची नाराजी आणि बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने
हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख मंगळवार, ३० डिसेंबर आहे. मात्र अर्ज भरण्यास केवळ एक दिवस बाकी राहिला तरी भाजपसह कोणत्याही प्रमुख पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीरच केली नाही. इच्छुकांची संख्या आणि मित्रपक्ष शिवसेनेला सोडावे लागणारे वॉर्ड यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते, हे लक्षात घेऊन उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय भाजपने घेतला. राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला होता. ही बैठक पार पडल्यानंतर रविवारी रात्रीपासूनच अनेकांना थेट एबी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत भाजपने १०० हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म वाटले.
नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी आमदारांवर
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. जे वॉर्ड भाजपला सुटले आहेत तेथे अनेक इच्छुक असले तरी एकालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे इतर नाराज होणार आहेत, तर दुसरीकडे, अनेक इच्छुकांचे वॉर्ड शिवसेना शिंदे यांच्या पक्षाला सोडले गेले आहेत.
त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची किंवा संभाव्य बंडखोरांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी भाजपने त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आपल्या आमदारांवर सोपवली आहे.
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीत भाजप सुमारे १४०, तर शिवसेना ८५ ते ९० च्या आसपास जागा लढवणार असल्याची माहिती आहे. २२७पैकी २०७ जागांच्या वाटपावर सहमती झाली आहे, त्यात भाजपला १२८, तर शिवसेनेला ७९ जागा सुटल्या आहेत. २० जागांवर सोमवारीसुद्धा सहमती झाली नव्हती. मुंबई भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासंदर्भातील तोडग्यावर बैठकीतील महायुतीच्या नेत्यांनी भाष्य करणे टाळले. केवळ महायुतीचा महापौर होईल, कोणतेही मतभेद नाहीत, असे सांगून नेत्यांनी वेळ मारून नेली.
मुंबईत जागावाटपात शिवसेनेकडून तडजोडीची भाषा केली जात नसल्याने अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे शेवटचा दिवसापर्यंत मुंबईतील महायुतीचा फॉर्म्युला गुलदस्त्यात होता. दुसरीकडे महायुतीचे जागावाटप निश्चित झाल्यानंतरच शिवसेनेकडन एबी फॉर्म वाटले जातील. असे सांगण्यात आले.
काँग्रेसची ८७ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सोमवारी काँग्रेसने ८७उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली.
या यादीत ३६ महिलांचा समावेश असून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १४ जणांना संधी देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत २२७ जागांसाठी काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन पक्षासोबत युती केली आहे.
वंचितला मुंबईत काँग्रेसने ६२ जागा दिल्या असून यावर वंचित लवकरच उमेदवारांची घोषणा करणार आहे.