बर्न: संपूर्ण जगात नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेला युरोपियन देश स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी शक्तिशाली स्फोट घडला आहे. राजधानी बर्नपासून २ तासांच्या अंतरावर स्थित क्रान्स-मोंटाना शहरातील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या स्फोटात ४० जण मरण पावले असून, मृतांमध्ये एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी पुष्टी करतानाच, मात्र हा दहशतवादी हल्ला नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या स्फोटामुळे स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या जल्लोषावर दुःखाचे विरजण पडले आहे.
स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत स्थित १५,००० लोकसंख्येच्या क्रान्स मोंटाना शहरातील आलिशान अल्पाइन स्की रिसॉर्टमध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू होता. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक पॅराग्लायडिंग, स्कीइंग, स्नोबोर्डिंग व गोल्फ आणि ट्रेकिंगचा आनंद लुटत होते. या रिसॉर्टच्या कॉन्स्टेलेशन बार व लाऊंजमध्ये १५० हून अधिक पर्यटक जमले होते. सर्वांनी गाण्यावर ठेका धरला होता. त्यामुळे त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. याचवेळी रात्री १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास
रिसॉर्टच्या तळघरात शक्तिशाली स्फोट झाला व आगीचा भडका उडाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यात बारचे छत कोसळून ४० जणांना प्राण गमवावा लागला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले.
https://lokwani.com/international-news/2025-major-accident-and-disaster-pain-and-tears/1813/
या स्फोटानंतर पोलीस, अग्निशमन दल, ४० रुग्णवाहिका व आपत्कालिन विभागाचे १५० अधिकारी तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात भरती केले. अनेक जखमींना १० हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट केले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या स्फोटातील पीडितांची ओळख पटवणे व मृतदेह त्यांच्या आप्तेष्टांना देण्याची प्रक्रिया सुरूअसल्याचे पोलीस म्हणाले. कॉन्स्टेलेशन बारमध्ये नाचगाणे सुरू असतानाच फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे स्फोट घडल्याचे सांगण्यात येत आहे. पण, त्याची पुष्टी पोलिसांनी केली नाही. दरम्यान, या स्फोटानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ परिसर सील केला असून क्रान्स-मोंटाना शहराला नो फ्लाय झोन घोषित केले.