मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज माघारी घेण्याचा आज म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. बंडखोर, अपक्षांना दुपारी ३ पर्यंत आपले अर्ज माघारी घेता घेतील. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करत बंडखोरी केलेल्यांनी माघार घ्यावी, यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतला असून, गेले दोन दिवस या नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. काही बंडखोर अजूनही माघार घेण्याच्या तयारीत नसून त्यांना रोखण्यात संबंधित पक्षांना यश येते की नाही, हे शुक्रवारी दुपारपर्यंत कळेल. सोबतच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचे चित्रही शुक्रवारी दुपारनंतर स्पष्ट होईल.
सत्ताधारी महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी असून गेले दोन दिवस सर्वच पक्षांकडून ‘डॅमेज कंट्रोल’ साठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी पक्षात भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीसुद्धा सर्वाधिक पाहायला मिळत आहे. मात्र ही बंडखोरी बंडखोरांची मनधरणी सुरू व नाराजांची मनधरणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर सोपवली आहे. मुंबई महापालिकेतील नाराजांशी चर्चा करून उमेदवारी मागे घेण्याची जबाबदारी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबईतील काही बंडखोरांना माघार घेण्यास भाग पाडण्यास भाजपला यश आले. ठाणे व कल्याण-डोंबिवलीची जबाबदारी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह संदीप लेले, संजय केळकर, निरंजन डावखरे हे पार पाडत आहेत. नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांचे तिकीट वाटपात वर्चस्व राहिले. त्यामुळे मंदा म्हात्रे गटाला डावलले गेल्याने नवी मुंबईत भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. तेथे वरिष्ठ पातळीवरून लक्ष घातले गेले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बंडखोरांचीसमजूत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली आहे. सर्वाधिक बंडखोरी व नाराजीची झळ बसलेल्या नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे बंडखोरांची समजून काढत आहेत. सोलापूरची जबाबदारी मंत्री जयकुमार यांच्यावर सोपवली आहे. छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी माजी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नागपूरमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तळ ठोकला आहे. सोबतच, उर्वरित महापालिकांमध्ये स्थानिक आमदारांसह काही मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी सोपवली आहे. जे बंडखोर माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत अशा काही मोजक्या बंडखोरांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली. तसेच पक्ष भविष्यात आपली दखल घेईल, अशी ग्वाही दिली.
काहींना हापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य, विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवर संधी दिली जाईल, असा शब्द दिला जात आहे. त्यामुळे आता किती बंडोबांना थंड करण्यात यश आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात फारशी बंडखोरी झालेली नाही. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काही जागांवर बंडखोरी झाली असली तरी स्वतः अजित पवार यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी नसल्यातच जमा आहे. काँग्रेसमध्ये नागपूरमध्ये आणि शिवसेना ठाकरे पक्षात मुंबई वगळता बंडखोरी नाही, परंतु तुल्यबल भाजपसोबत रंगतदार लढतीसाठी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येत जोरदार लढतीसाठी प्रयत्न करत आहेत.
मुंबईत शिवसेना ठाकरे आणि मनसे युतीमध्ये दोन्ही पक्षांच्या इच्छुकांकडून बंडखोरी झाली आहे. ठाकरेंच्या पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांच्या काही जागा मनसेला सोडल्याने नाराजी आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत हे त्यांच्याशी संवाद साधून माधार घेण्यास भाग पाडत आहेत.
मनसे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढत असल्याने अनेक मनसैनिकांचे वॉर्ड शिवसेनेला सुटले आहेत. त्यामुळे मनसेतूनही बंडखोरी झाली. त्यावर राज ठाकरेंसह बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांव्याकडून समजूत घातली जात आहे.
आज दुपारनंतर राज्यातील चित्र स्पष्ट होणार
राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २८६९ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत ३३ हजार ६०६ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी बुधवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. यात प्रमुख पक्षांच्या काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आता शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ दिली आहे. तोपर्यंत किती बंडखोर, अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. त्यामुळे राज्यातील २९ महापालिकांतील निवडणूक लढतीचे चित्र शुक्रवारी दुपारी ४ नंतर स्पष्ट होईल.
राज्यात १६ नगरसेवक बिनविरोध
महापालिका निवडणुकांसाठी अर्जाची छाननी सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीसह काही ठिकाणी बिनविरोध विजयाच्या गुलालाची उधळण झाली आहे. केडीएमसीत भाजपचे ५ आणि शिवसेना शिंदे गटाचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १२२ सदस्य असलेल्या केडीएमसीत सत्तास्थापनेसाठी आवश्यक ६२ संख्याबळापासून महायुती आता केवळ ५३ जागा दूर आहे. भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील यांच्या पाठोपाठ आता ज्योती पवन पाटील याही २४ ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. २८ अ मधून आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल राजेश मोरे
यांची बिनविरोध निवड झाली आहे. जळगावमध्ये शिंदे गटाचा १ नगरसेवक, अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि भिवंडीत खा. कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील हे बिनविरोध निवडून आले. धुळ्यातून दोन, पनवेलमधून एक तर मालेगावमध्ये मुस्लिम पार्टीचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे.
केडीएमसीमध्ये महायुतीचे ९ उमेदवार बिनविरोध
डोंबिवलीत शिवसेना-भाजप महायुतीचे आतापर्यंत तब्बल ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे डोंबिवली पश्चिमेतील शिवसेना आणि भाजपचे संपूर्ण पॅनलच बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपने घडवलेल्या चमत्कारी खेळीबाबत चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी झाली. आता २ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यामध्ये किती आणि कोणते उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष
लागले असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक २७ (अ) मधून भाजपच्या मंदा सुभाष पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मनसेच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
आमदार पुत्रही बिनविरोध
डोंबिवली पूर्वतील प्रभाग क्रमांक २८ (अ) मधून हर्षल राजेश मोरे या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने हर्षल मोरे बिनविरोध निवडून आले आहेत. हर्षल मोरे हे कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांचे सुपुत्र आहेत.
डोंबिवलीतील प्रभाग क्र. २४ संपूर्ण पॅनल बिनविरोध
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्र. २४ मधील शिवसेना उमेदवार रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी आणि भाजपच्या ज्योती पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना-भाजप महायुतीचे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून येण्याचा चमत्कार घडला आहे.