अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनांनी देश हादरला
निष्पापांचे बळी… हजारोंची घरे उद्ध्वस्त
२०२५ हे वर्ष भारतासाठी अनेक अर्थांनी वेदनादायी ठरले. विविध भागांत घडलेल्या मोठ्या दुर्घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. रस्ते अपघात, रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, स्फोट, पूर, भूस्खलन आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर हजारो कुटुंबांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. या घटनांनी मृत्यूच्या आकड्यांपुरतेच मर्यादित न राहता, माणसाच्या सुरक्षिततेबाबत असलेली अस्वस्थ करणारी वास्तविकता समोर आणली.
या दुर्घटनांमागे अनेकदा मानवी निष्काळजीपणा, तांत्रिक बिघाड, अतिआत्मविश्वास आणि निसर्गाचा प्रकोप कारणीभूत ठरला. या वर्षात घडलेल्या या केवळ दुर्घटना नाहीत, तर समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. २०२५ मधील या घटनांचा मागोवा घेताना, माणूस, यंत्रणा आणि निसर्ग यांच्यातील नाजूक समतोल किती सहज ढासळू शकतो, याचा प्रत्येय येतो.
नवं वर्ष येतंय आणि या नव्या वर्षाच्या स्वगतासाठी अवघे जग सज्ज झाले आहे, पण नव्या वर्षाचा आनंद साजरा करताना सरत्या वर्षातील कटू आठवणीही कायम स्मरणात राहतील. कॅलेंडरवरील तारखा बदलत असतात, पण या वर्षाने दिलेल्या जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत. यानिमित्त २०२५ या सरत्या वर्षात घडलेल्या दुर्घटनांचा घेतलेला आढावा…
अहमदाबाद विमान दुर्घटनेने देश हादरला
१२ जून २०२५ रोजी एअर इंडिया आणि बोईंगच्या इतिहासातील काळा दिवस होता. एअर इंडीयाचे फ्लाईट-१७१ हे लंडनला निघालेले विमान उड्डाणानंतर अवघ्या काही तासांत कोसळले. यात २४१ प्रवाशी आणि क्रू मेंबरसह २६५ जणांचा बळी गेला. आश्चर्यकारकरित्या एकच प्रवासी बचावला होता. कोणी मुलाला भेटण्यासाठी, तर कोणी नव्या संधीच्या शोधात लंडनला निघाले होते, पण ही सर्व स्वप्ने अपूर्ण राहिली. काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. त्याचे पडसाद अजून उमटतायेत.
प्रयागराज कुंभमेळा चेंगराचेंगरी
वर्षाच्या सुरुवातीलाचा २९ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३७ जणांचा मृत्यू झाला. सरकारने दिलेले हे आकडे आहेत. मात्र ८० पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. तर कित्येक जखमी झाले. मौनी अमावस्येच्या दिवशी संगम परिसरात लाखो यात्रेकरू पवित्र स्नानासाठी जमले असताना ही घटना घडली.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी
तमिळनाडूतील करूर जिल्ह्यात २७ सप्टेंबर साऊथ सुपरस्टार विजयच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा बळी गेला. तर कित्येक जण गंभीर जखमी झाले. अभिनेता थलपती विजय याने तमिझगा वेत्री कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली असून तामिळनाडूतील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने करूर येथे सभा आयोजित केली होती. या सभेसाठी जवळपास 30 हजारहांहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती.
गोवा नाईट क्बल जळीतकांड
गोव्याच्या उत्तरेला अर्पोरा भागात बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा आग लागली. या अग्नितांडवात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 19 नाइट क्लब स्टाफचे सदस्य आहेत. गॅस सिलिंडर स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगितले गेले. मात्र अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
तेलंगणा फार्मा कंपनी स्फोट
तेलंगणा 30 जून रोजी सकाळी सव्वा आठ ते साडे नऊच्या दरम्यान, साडे आठ ते साडे नऊ दरम्यान पासुमिलाराम औद्योगिक क्षेत्रातील फार्मा कारखान्यातील स्फोटात ५० जणांचा मृत्यू झाला. डीएनए चाचणीद्वारे एका मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. घटनेवेळी कारखान्यात १५० लोक होते, स्फोट झाला त्या ठिकाणी ९० लोक उपस्थित होते.
थरकाप उडवणारा जैसलमेर बस अपघात
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ६ डिसेंबर रोजी खासगी आराम बसला लागलेल्या भीषण आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की बस मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत अडकून पडले होते. तर काहींच्या मृतदेहाचा कोळसा झाला होता. यात पत्रकार राजेंद्र चौहान यांचाही समावेश होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचाही मृत्यू झाला. आगीत पंधरा जण ७० टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. जखमींमध्ये लग्नापूर्वीच्या शूटिंगनंतर जोधपूरला परतणाऱ्या जोडप्याचा समावेश होता.
ााढ झोपेत असताना काळाने गाठले
हैदराबादहून बेंगळूरुकडे निघालेल्या एका आलिशान स्लीपर बसला पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात १९ प्रवाशांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात, राष्ट्रीय महामार्ग ४४ वर ही घटना घडली. साधारणपणे पहाटे 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. ही कावेरी ट्रॅव्हल्सची बस सुमारे ४० प्रवाशांना घेऊन हैदराबादहून बेंगळूरुला जात होती. बसमध्ये बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते.
मदिना बस अपघात
सौदी अरेबियातील मदिनाजवळ १७ नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला. अपघातानंतर लागलेल्या आगीत ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये २० महिला आणि ११ चिमुकल्यांचा समावेश आहे. तर बसमधील एक प्रवासी बचावला. सर्व प्रवासी उमरा करण्यासाठी सौदी अरेबियाला गेले होते आणि मक्काहून मदीनाला जात होते. यावेळी मुफरीहाटजवळ बस एका डिझेल टँकरशी धडकली त्यानंतर ही दुर्घटना घडली.
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या एका शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला. हा दहशतवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट होता.
गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील चार दशके जुन्या पुलाचा काही भाग १६ डिसेंबर रोजी कोसळला, ज्यामुळे वाहने महीसागर नदीत कोसळली आणि २० जणांचा मृत्यू झाला.
बंगळुरू चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ४ जून रोजी आयपीएल सेलिब्रेशदरम्यान चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू
तिरूपती मंदिरात ८ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू
२२ जानेवारी रोजी जळगाव रेल्वे अपघातात १३ जणांचा मृत्यू
१५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीत १८ भाविकांचा मृत्यू
निसर्गही कोपला
पंजाबमध्ये जवळपास चार दशकांतील मोठा महापूर आला होता. अतिवृष्टीमुळे सतलज, बियास आणि रावी नद्यांना आलेल्या पुरामुळे १,४०० हून अधिक गावे आणि ४.८ लाख एकर शेतजमीन पाण्याखाली गेली. ५७ लोकांचा मृत्यू झाला.
उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे विनाशकारी चिखलाचा प्रवाह आला. ज्यामुळे धराली शहर गाळाखाली गाडले गेले आणि हॉटेल्स, घरे व बाजारपेठ वाहून गेली.
किश्तवाड, जम्मू आणि काश्मीर येथील माचैल माता यात्रेच्या बेस कॅम्पवर ढगफुटी झाली, ज्यामुळे किमान ५० लोकांचा मृत्यू झाला.
ईशान्य भारतात विक्रमी मान्सूनपूर्व पावसामुळे आसाम, मणिपूर आणि मिझोराममध्ये महापूर आणिभूस्खलन झाले, ज्यात किमान ६५ लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक प्रभावित झाले.
२०२५ मध्ये घडलेल्या या दुर्घटना केवळ आकडेवारीपुरत्या मर्यादित नाहीत. तर प्रत्येक अपघातामागे उद्ध्वस्त झालेले कुटुंब, अपूर्ण स्वप्ने दडलेली आहेत. या घटना विस्मृतीत जाण्याऐवजी त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सुरक्षिततेबाबत जागरूकता, जबाबदारी आणि संवेदनशीलता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवल्यास भविष्यात अशा वेदनादायी प्रसंगांची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते. हीच या घटनांना खरी श्रद्धांजली ठरेल.