मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभघेणाऱ्या महिलांसाठी आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात गुरुवारी परिपत्रक जारी केले. या ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून लाभार्थी महिलांनी या विहित कालावधीत ई-केवायसी न केल्यास या योजनेचा पुढील लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, योजनेच्या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. केवायसीसाठी ladakibahin. maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थीनी पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी पूर्ण न केल्यास त्या महिलांना पुढील आर्थिक लाभासाठी अपात्र ठरवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील
सर्व लाभार्थी भगिनींना वेब पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज आणि सुलभ असून पारदर्शकता राखण्यासाठी तसेच पात्र महिलांना नियमित लाभ मिळण्यासाठी महत्त्वाची आहे. याचबरोबर भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही ही प्रक्रिया उपयुक्त ठरेल.
आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री