मुंबई : राज्यातील सुमारे अडीचशेहून अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानप्रसंगी अनेक ठिकाणी बोगस मतदार, पैसे वाटप, हाणामारी, लाठीचार्ज आणि कार्यकर्ते भिडल्यामुळे राडा असेच चित्र पाहावयास मिळाले. चंद्रपूर, बीड, माजलगाव, मुक्ताईनगर, बुलढाणा, गेवराई, जळगाव, मनमाड, तासगाव कोकणात महाड, रोहा, सिंधुदुर्गापासून डहाणू, बदलापूरपर्यंत महायुतीतील कार्यकर्तेच परस्परांविरोधात आक्रमक झाले होते. शिर्डी, बुलडाणा, जामनेरमध्ये बोगस मतदारांची धरपकड करण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात हिंगोलीत गुन्हा दाखल करण्यात आला. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील पक्षांनी स्थानिक पातळीवर मात्र अनेक ठिकाणी एकत्र येत स्वतःच्याच मित्रपक्षाविरोधात दंड थोपटले आहेत.
सांगली जिल्ह्यात नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान : अनेक ठिकाणी तणाव
। सांगली नगर परिषद । नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस गा ६ नगर परिषद तसेच शिराळा व आटपाडी या २ नगर पंचायतींसाठी मंगळवारी चुरशीने आणि चढाओढीने मतदान पार पडले. निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी वादावादी, अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. तासगावात पारंपरिक विरोधक असलेले आर. आर. आबा व माजी खासदार संजयकाका गटातील कार्यकर्ते मतपान प्रक्रियेदरम्यान समोरासमोर आल्यामुळे दुपारनंतर तणावाची परिस्थिती उद्भवली, अनेक ठिकाणी कार्यकत्यांत अक्षरशः खडाजंगी झाली. शिवीगाळ, ढकलाढकली आणि अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडताच परिसरात गोंधळाचे वातावरण पसरले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमाव पांगवल्यानेअनर्थ टळला. सायंकाळी मतदान संपेपर्यंत वातावरणातला तणाव कायम होता.
तासगावात काही प्रभागांत बोगस मतदानाच्या तक्रारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नोंदवल्या जात होत्या, अनेक ठिकाणी या गोष्टीमुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर येत होते. प्रभाग क्रमांक चार मतदान केंद्राजवळ तक्रार झाल्यामुळे आमदार रोहित पाटील स्वतः प्रभाग क्रमांक चारच्या गणपती मंदिरासमोरील बुधवर दाखल झाले. येथे बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांच्या बुधवर थांबण्यावरून आमदार पाटील व पोलिसांमध्ये चांगलाच वाद रंगला.
दरम्यान, पुन्हा चोगस मतदानाची तक्रार झाल्याने रोहित पाटील यांच्या कार्यकत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याचवेळी स्वाभिमानी आघाडीचे युवा नेते प्रभाकर पाटील हेही आपल्या कार्यकत्यांसह त्या ठिकाणी पोहोचले. दोन्ही नेते कार्यकत्यांसह
आमने-सामने येताच परिस्थिती क्षणात चिघळली.घटनेनंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून दोन्ही गटांना शांत करत मतदान केंद्र परिसरात नियंत्रण प्रस्थापित केले. इस्लामपुरात जि. प. शाळा नं. १ येथील मतदान केंद्राबाहेर दोन गट आमने-सामने आले. या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा बंदोबस्त वाढवून येथील अनुचित प्रकार टाळण्यात पोलिसांना यश आले.
बदलापुरात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
बदलापूर: बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हाणामारीच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रभाग क्र. २२ मध्ये मतदान केंद्राबाहेर शिंदेंची शिवसेना व भाजप कार्यकत्यांमध्ये राडा झाला, तर प्रभाग क्र. ६ मध्ये भाजप व शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बदलापूरमध्ये प्रभाग क्र. १, ४ आणि १३ या तीन केंद्रांवर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना अर्धा ते दीड तास रांगेत ताटकळत राहावे लागले. याबद्दल मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दिवसभर अशा मतदार केंद्रांबाहेर रांगा कायम होत्या. शहरातील विविध भागांत रस्त्यांच्या दुतर्फा राजकीय पक्षांचे उभारलेले बुथ आणि त्याभोवती मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि मतदारांची गर्दी होत होती. या बुथजवळ अनेकांकडून बेशिस्त वाहने उभी करण्यात आली होती. त्यामुळे बूथ उभारलेल्या सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला होता.
मोठा भाऊ होण्यासाठी रस्सीखेच
मागील निवडणुकीत मिळालेल्या संख्याबळानुसार शिवसेना हा नगर परिषदेतील सर्वांत मोठा पक्ष होता, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीपासून भाजप व शिवसेनेत नगर परिषदेतील मोठा भाऊ होण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. त्यात पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी युती झाली आहे.
महाडमध्ये हाणामारी
नगरपालिका निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे गाजली. शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले याचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांच्या समर्थकाने पिस्तुल रोखल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर ही हाणामारी झाली. प्रभाग तीन मधील मतदान केंद्राजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सुशांत जाबरे आणि विकास गोगावले यांच्यात वाद झाल्यानंतर जाबरे समर्थकांकडून हिसकावून घेण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आले.
बदलापुरात ५८.३० टक्के, तर पालघरमध्ये ६८.२९ टक्के मतदान
ठाणे ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी ५८.३० टक्के, तर पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत सरासरी ६८.२९ टक्के मतदान झाले. बदलापूरमध्ये सकाळपासून मतदारांनी रांगा लावून शांततेत मतदान केले. ठिकठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार आणि डहाणू या नगर परिषदांसह वाडा नगरपंचायतीची निवडणूक मंगळवारी – झाली. यात मतदारांचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यातील चारही = ठिकाणी सरासरी ६८.२९ टक्के – मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान
॥ पुणे : पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सुरू झालेल्या मतदानात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान नोंदवले, तर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. दरम्यान, सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी ७६ आणि सदस्य पदासाठी ९५५ असे एकूण १ हजार ३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
सोलापूर सरासरी ७० टक्के मतदान
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यावेळी अकलूज येथे ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रकार घडला आहे. कुडूवाडी आणि मोहोळ या ठिकाणी काही काळ ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना वगळल्यास सोलापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी शांततेत जवळपास ७० टक्के मतदान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत मतदान
कोल्हापूर :महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगर परिषद व ३ नगरपंचायतींमध्ये मंगळवारी किरकोळ प्रसंग वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जयसिंगपूर आणि गडहिंग्लज नगर परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
आमदार संतोष बांगर -यांच्यावर गुन्हा
सत्ताधारी शिवसेनेचे आमदार – संतोष बांगर यानी हिंगोलीतील बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक तीनवर मतदानाचा हक्क बजावला. तेव्हा त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमवरचे बटन दाबण्यास सांगितले. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. फोनचाही वापर केला. या साऱ्या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. निवडणूक आयोगाने त्यांच्या या कृतीची गंभीर दखल घेत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मतमोजणी २१ डिसेंबरला
नागपूर : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी व निकाल २१ डिसेंबर या एकाच दिवशी जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल याचिकांवर मंगळवारी (२ डिसेंबर) दिले. राज्यातील २५० पेक्षा अधिक नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मंगळवारीच मतदान झाले. सर्व निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला जाहीर करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. न्यायमूर्ती अनिल किलोर
२० डिसेंबरपर्यंत एक्झिट पोलवर बंदी, निवडणूक आयोगाला नोटीसआणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी मतमोजणी पुढे ढकलली. त्यामुळे आता सर्वच निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य शासनासह निवडणूक आयोगाला नोटीस बजावून येत्या १० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.
निवडणुकीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, याकरिता उच्च न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यासही मनाई केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश दिले.विविध नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी
झाली. राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचे निकाल बुधवार, ३ डिसेंबर रोजी जाहीर करू नयेत. हे निकाल २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालांसोबतच एकत्रितपणे जाहीर करावेत. ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केल्यास, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर ‘जनमताचा कौल’ उघड होऊन निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. एक्झिट पोल २ डिसेंबर रोजी मतदान सुरू झाल्यापासून ते २० डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत कोणत्याही व्यक्तीने प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने एक्झिट पोलचे निकाल प्रकाशित किंवा प्रसारित करू नयेत. निकालाची घोषणा होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार असून त्यादरम्यान राज्य निवडणूक आयोगाने याचिकांवर आपले उत्तर दाखल करावे. शकील अहमद मन्सुरी, अश्विनी नरेंद्र बुरडे व सचिन चुटे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोझ
मिर्झा, अॅड. आनंद देशपांडे, अॅड. एच. एस. चितळे, अॅड. वेदांत पांडे, अॅड. अभिनव सक्सेना, अॅड. ए. एम. काझी, आयोगातर्फे अॅड. अमित कुकडे व सरकारतर्फे अॅड. कल्याणी मारपकवार यांनी बाजू मांडली.
निकालाच्या उशिरामुळे मतदारांमध्ये गोंधळ
राज्यातील २५० पेक्षा अधिक नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. तर न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे २४ नगर परिषद आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आता २० डिसेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावेळी रद्द झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांना जुनी चिन्हे देण्यात यावीत, तसेच खर्चाची मर्यादा वाढवून देण्यासह सर्व निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ३ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीला स्थगिती दिली. या निर्णयानंतर सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतींची मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबरला होणार आहे. राज्यातील २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने २४ संपूर्ण नगर परिषद, तर १५० पेक्षा अधिक प्रभागांमधील निवडणूक स्थगित केली. या निवडणुकीत एक कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत. दरम्यान, निकालाच्या उशिरामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.